बक्सर -देशात कोरोनाच कहर असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बिहारच्या बक्सरमध्ये त्याच-त्याच रुग्णवाहिकांचे चारदा उद्घाटन झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील बातम्या ईटीव्ही भारतने सातत्याने प्रकाशित केल्या. यावर ईटीव्ही भारतचे वार्ताहर उमेश पांडे यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही एफआयआर भाजपा नेते आणि बक्सर विधानसभेचे माजी उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी दाखल केली.
उमेश पांडे यांच्यावर बक्सरच्या सदर पोलीस ठाण्यात 500, 506, 290, 420 आणि कलम 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते परशुराम चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे आणि भाजपाची प्रतिमा डागाळण्याचा आरोप उमेश पांडे यांच्यावर केला आहे.
14 मे 2021 रोजी ईटीव्ही भारतने बक्सरमधील एक बातमी प्रकाशित केली होती. 'जनतेची फसवणूक! 5 जुन्या रुग्णवाहिकांवर नवीन स्टिकर लावून दुसऱ्यांदा उद्घाटन करणार अश्विनी चौबे' असे त्या बातमीचे शीर्षक होते.
या बातमीनंतर राज्यात गोंधळ उडाला. तथापि, 15 मे 2021 रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सर्व रुग्णवाहिकांचे पुन्हा उद्घाटन केले. याप्रकरणी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी पांडे यांनी अधिक तपास केला असता, रुग्णवाहिकांचे दुसऱ्यांदा नाही, तर चौथ्यांदा उद्घाटन करण्यात आल्याचे समोर आले.'रुग्णवाहिकांवर नवीन स्टिकर लावून रुग्णवाहिकांचे चौथ्यांदा उद्धघाटन' अशी बातमी प्रकाशित करण्यात आली. यावेळी अश्विन चौबे यांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केली. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. रुग्णावाहिका उद्घाटन प्रकरणी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
यातच या प्रकरणाने आणखी एक नवीन वळण घेतले. चार वेळेस उद्घाटन झालेल्या रुग्णवाहिकांची नोंदणीच झाली नसल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2020मध्येच बीएस-4 मॉडेल वाहनांच्या नोंदणीवर बंदी घातल्याचे बक्सर जिल्हा परिवहन अधिकारी मनोज रजक यांनी सांगितले. बक्सर जिल्हा परिवहन अधिकारी मनोज रजक यांच्या प्रतिक्रियेसह ईटीव्ही भारतने 22 मे 2021 लाही बातमी ठळकपणे प्रकाशित केली.
रुग्णवाहिकांची नोंदणीच झाली नसल्याची बातमी प्रकाशित झाल्याच्या दोन दिवसांनंतर 24 मे 2021 रोजी बक्सर जिल्हा परिवहन अधिकारी मनोज रजक यांनी घुमजाव घेत, वाहनांची नोंदणी सध्या करता येत नाही. कारण सॉफ्टवेअरमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. गाड्या अजूनही सुरू आहेत. आरोग्य विभाग स्तरावर बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.