घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कानपूर देहात : कानपूर देहात येथे आई-मुलीला जाळलेल्या प्रकरणी सोमवारी रात्री एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून 11 नामांकित आणि 12 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबाने आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाला पत्र दिले आहे.
काय आहे प्रकरण? :हे प्रकरण कानपूर जिल्ह्यातील रुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. कानपूरजिल्हा आणि तहसील प्रशासनाची टीम अतिक्रमणाखाली असलेले मंदिर पाडण्यासाठी गेली होती. यावरून पीडितेच्या कुटुंबीयांशी त्यांची बाचाबाची झाली. यादरम्यान मंदिराजवळील झोपडीला आग लागली. या आगीत आई आणि मुलीचा भाजून मृत्यू झाला. कुटुंबाला वाचवताना पीडितेचे वडीलही गंभीर जखमी झाले. मात्र प्रशासनाच्या पथकानेच घराला आग लावून आई-मुलीची हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने या गरीब कुटुंबाला कसे धमकावले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कुटुंबियांची भरपाईची मागणी : पीडित कुटुंबाने सांगितले की, 14 जानेवारी रोजी डीएम कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी न्यायाची याचना केली होती. असे असतानाही तहसील प्रशासनाने पीडितेचे घर जबरदस्तीने पाडले. डीएमने पीडितेच्या कुटुंबियांना ३ दिवसांत न्याय देण्याचे आश्वासनही दिले होते. अधिकाऱ्यांनी आई-मुलीला पेटवून दिल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनावर केला आहे. पीडित कुटुंबीयांनी 5 कोटींची भरपाई, कुटुंबातील दोन सदस्यांना सरकारी नोकरी, कुटुंबाला आजीवन पेन्शन मिळावी, अशी मागणी प्रशासनासमोर ठेवली आहे. मृतांच्या दोन्ही मुलांना सरकारकडून घरे आणि तातडीने न्याय मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेतली आहे.
समाजवादी पक्ष अॅक्शन मोडमध्ये : या प्रकरणी सपा आमदार अमिताभ बाजपेयी म्हणाले की, योगी सरकारचा बुलडोझर बेधुंद झाला आहे. ते म्हणाले की, योगी सरकारमध्ये पोलिस आणि प्रशासनाला मिळून विरोधकांचा आवाज दाबायचा आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सपा आमदार अमिताभ बाजपेयी यांच्या काकदेव येथील निवासस्थानाबाहेर अनेक पोलिस ठाण्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी म्हणाले की, सपा आमदार कानपूर देहातला जात असल्याची माहिती मिळाली होती. तेथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कानपूर देहातमध्ये आई आणि मुलीच्या जाळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समाजवादी पक्षाने शिष्टमंडळ तयार करून अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार 11 सदस्यीय शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा :Cracks In Agra Fort : आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आमचे संगीतामुळे नुकसान, भिंती आणि छताला गेले तडे