नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, त्यांना मध्यमवर्गाच्या दबावाची जाणीव आहे. मात्र त्याचवेळी सध्याच्या सरकारने त्यांच्यावर कोणताही नवा कर लादला नसल्याचेही त्यांनी सांगितले. निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2023-24 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकार आयकर मर्यादा वाढवेल आणि मध्यमवर्गीय करदात्यांना आणि इतरांना दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे. तर निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प असेल.
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार : कार्यक्रमाला संबोधित करताना त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने त्यामुळे मध्यमवर्गावर कोणताही नवीन कर लादलेला नाही. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री केंद्र सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. आशा व्यक्त केल्या जात आहेत की 2023-24 या आर्थिक वर्षात सरकार आयकर स्लॅबमध्येही बदल करेल. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
सरकारने कोणताही नवीन कर लावला नाही :अर्थमंत्री सीतारमन म्हणाल्या की, 'मी देखील मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मी मध्यमवर्गीयांचा दबाव समजू शकते. सीतारमन पुढे म्हणाल्या की, सध्याच्या सरकारने मध्यमवर्गावर कोणताही नवीन कर लादलेला नाही. तसेच, त्या म्हणाल्या की, 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आयकरातून मुक्त होणार आहे.