मुंबई : कलवरी श्रेणीच्या पाणबुडीतील पाचवी पाणबुडी आयएनएस 'वगीर' सोमवारी भारतीय नौदलात दाखल झाली आहे. या पाणबुडीच्या समावेशान नौदलाच्या ताकदीत भर पडली आहे. आयएनएस वगीरची निर्मिती मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने केली आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत या पाणबुडीला नौदलात सामील करण्यात आले.
सर्वोत्तम शस्त्रास्त्रांनी सुसज्ज : नौदलाने सांगितले की, आयएनएस वगीर जगातील काही सर्वोत्तम सेन्सर्स आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. यामध्ये वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो आणि पृष्ठभागावर मारा करणार्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, जे शत्रूच्या मोठ्या ताफ्यांना निकामी करू शकतात. नौदलाच्या म्हणण्यानुसार, या पाणबुडीमध्ये विशेष ऑपरेशन्ससाठी मरीन कमांडोना उतरवण्याची क्षमता आहे, तर तिचे शक्तिशाली डिझेल इंजिन बॅटरी खूप लवकर चार्ज करू शकते. या पाणबुडीत स्वसंरक्षणासाठी अत्याधुनिक टॉर्पेडो डिकॉय यंत्रणा बसवण्यात आली आहे. हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या वाढत्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयएनएस वगीरचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. वगीर बनवण्यासाठी लागणारा वेळ आतापर्यंत बांधलेल्या सर्व पाणबुड्यांमध्ये सर्वात कमी आहे. नौदल प्रमुख म्हणाले, 'वगीर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. 24 महिन्यांच्या कालावधीत नौदलात सामील होणारी वगीर ही तिसरी पाणबुडी आहे. पूर्वीचे वगीर 1 नोव्हेंबर 1973 रोजी कार्यान्वित झाले होते आणि त्याने प्रतिबंधात्मक गस्तीसह अनेक ऑपरेशनल मोहिमा हाती घेतल्या होत्या. सुमारे तीन दशके देशाची सेवा केल्यानंतर जानेवारी 2001 मध्ये ही पाणबुडी बंद करण्यात आली होती.