अलाप्पुझा (केरळ) :केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात प्राथमिक अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसचे प्रकरण नोंदवले गेले आहे. या दुर्मीळ आजारामुळे एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला या आजाराची लागण झाली होती. त्याच्यावर गेल्या रविवारपासून अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. पानवल्ली पूर्व मैथरा येथील अनिल कुमार आणि शालिनी यांचा मुलगा गुरुदुथ (15) असे मृताचे नाव आहे. तो दहावीचा विद्यार्थी होता.
रोगामुळे मेंदूला संसर्ग होतो : ओढ्यात आंघोळ केल्यानंतर हा आजार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. डॉक्टरांनी सांगितले की, गढूळ पाणवठ्यांमध्ये आढळणारी नेग्लेरिया फॉवलेरी माणसाच्या नाकातून डोक्यापर्यंत पोहोचते. जेव्हा त्याचा मेंदूला संसर्ग होतो तेव्हा ते प्राणघातक ठरू शकते. अलाप्पुझा जिल्ह्यात प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस रोगाची नोंद होण्याची ही दुसरी वेळ आहे. 2017 मध्ये अलाप्पुझा नगरपालिका क्षेत्रात प्रथमच हा आजार आढळून आला होता. त्यानंतर आता या आजाराची नोंद झाली आहे.
आजाराची लक्षणे : ताप, डोकेदुखी, उलट्या आणि अपस्मार ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (PAM) हा नेग्लेरिया फॉउलरीमुळे होणारा दुर्मिळ मेंदूचा संसर्ग आहे. नेग्लेरिया फॉलेरी हा अमिबा आहे. (सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसणारा खूपच लहान एकल पेशी जीव). दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर 1 ते 2 आठवड्यांच्या आत याचे लक्षणे दिसू लागतात. याचे पहिले लक्षण म्हणजे वास किंवा चव बदलणे. नंतर, लोकांना डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
दूषित पाण्यात आंघोळ करणे टाळा : या आजारावर अॅम्फोटेरिसिन बी, अॅझिथ्रोमाइसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिलटेफोसिन आणि डेक्सामेथासोन या औषधांसह उपचार केले जाऊ शकतात. तज्ञ म्हणतात की, या औषधांचा वापर Naegleria fowleri विरुद्ध प्रभावी आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यात आंघोळ करणे आणि अशुद्ध पाण्याने चेहरा व तोंड धुणे पूर्णपणे टाळावे. यामुळे हा रोग होऊ शकतो. तसेच पाऊस सुरू झाल्यावर नाल्यांमध्ये आंघोळ करणे टाळा. असेही डॉक्टर म्हणाले.
हेही वाचा :
- Monsoon Clothes Care : पावसाळ्यात कपडे निर्जंतुक ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
- Dengue Patient : डेंग्यू झाल्यास हे पदार्थ आहारात ठेवा, प्लेटलेट्स वेगाने वाढतील