कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये येत्या वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. नुकतचं तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आज त्यांनी भाषणादरम्यान तृणमूल काँग्रेसवर टीका केली. गेली तब्बल 21 वर्ष तृणमूल पक्षातहोतो. याची मला आता लाज वाटत आहे, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.
तृणमूल काँग्रेसमध्ये गेली 21 वर्ष मी होतो. याची मला आता लाज वाटत आहे. त्या पक्षात कोणतीही शिस्त नाही. एका कंपनीप्रमाणे पक्ष चालवला जातो. त्या पक्षातून बाहेर पडून एका योग्य पक्षाचा मी सदस्य झालो आहे. जर राज्याचा विकास हवा असेल, नोकऱ्या हव्या असतील तर फक्त भाजपाच एक पर्याय आहे, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.
राज्यात 135 भाजपा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राज्यात काम करत आहेत. आपल्या राज्याचे सोनार बंगालमध्ये रुपांतर करायचे आहे, असे अधिकारी म्हणाले.
ममतांचा 'योद्धा' भाजपला जाऊन मिळाला -
बंगालच्या राजकारणात दबदबा असलेल्या अधिकारी भाजपात सहभागी झाल्याने भाजपला त्यामुळे अधिकच बळ मिळालं आहे. तृणमूलमधून त्यांनी हळूच काढता पाय घेतला. प्रथम त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारिकीचा राजीनामा दिला. तर लागलीच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, तृणमूलला रामराम ठोकला. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अधिकारी यांच्यासह राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे.
पश्चिम बंगाल निवडणूक -
भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.