ठाणे :श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी (Nag Panchami) हा सण दरवर्षी साजरा केला जातो. नागपंचमी च्या दिवशी नागांची पूजा करून त्यांना दूध पाजण्याची पूर्वीपासून परंपंरा आहे. नागपंचमीला नागाची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात. शिवाय कुटुंबाला कधीही हानी पोहोचवत नाही. अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा नागपंचमी २ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. तेव्हा नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध पाजणे (Feeding milk Snakes) श्रद्धा नसून अंधश्रद्धा (is not faith but superstition) आहे. आणि ते फार हानिकारक व नागांच्या जीवावर बेतण्यासारखे आहे. त्यामुळे नागांना दूध पाजू नका. असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोबे यांनी, ई टीव्ही भारतच्या माध्यमातून भाविकांना केले आहे.
नाग दूध पचवू शकत नाहीत :श्रावण महिन्याच्या पंचमीचा दिवस सापांना समर्पित असल्याची परंपंरा असल्याचे, पुरातन काळापासून सांगितले जात आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी ऋषीमुनींच्या काळात नागाला दुधाने आंघोळ करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जातो. शास्त्रातसुद्धा नागाला दुधाने आंघोळ करण्याचे सांगितले आहे. मात्र दुधाने आंघोळ करण्याऐवजी, भाविकांनी नागाला व सापाला दूध पाजण्याची परंपरा सुरू केली. नागाला दूध पाजणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे असून; यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत. दूध प्यायल्याने त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन होते आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी सांगितले.