प्रतापगड (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशातील वैद्यकीय व्यवस्थेचा हाल अत्यंत दयनीय आहे. आता प्रतापगड जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पुन्हा एकदा निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. शववाहिनी न मिळाल्याने एका वडिलांना आपल्या लहान मुलीचा मृतदेह दुचाकीवरून न्यावा लागला. रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर हे जोडपे बराच वेळ शववाहिनेची वाट पाहत राहिले. मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये मुलीचा मृतदेह घेऊन तिची आई तासनतास रडत होती, परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही. या ह्रदयद्रावक घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
काय आहे प्रकरण : अंतू पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याणपूर मौरा गावात राहणाऱ्या भीमराव यांच्या ८ महिन्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली होती. मुलीला जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला स्थानिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथून डॉक्टरांनी त्यांना गुरुवारी राजा प्रताप बहादूर रुग्णालयात रेफर केले. येथे उपचारादरम्यान सायंकाळी उशिरा मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रडून आक्रोश केला.