श्रीनगर Farooq Abdullah :जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला काश्मीर प्रश्नावर चर्चेचं आवाहन केलं आहे. "पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि नवाझ शरीफ यांनी चर्चेची गरज व्यक्त केली होती, मात्र केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार नाही", असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तर काश्मिरींची स्थिती पॅलेस्टिनींप्रमाणे होईल : फारुख अब्दुल्ला म्हणाले की, केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे. वाजपेयी म्हणाले होते की, भारत आपले मित्र बदलू शकतो, परंतु शेजारी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही युद्धानं नव्हे तर संवादानं प्रश्न सोडवले जाऊ शकतात, असं म्हटलं आहे. परंतु संवाद कुठे आहे? असा घणाघात त्यांनी केला. "भारत आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला नाही, तर काश्मिरी लोकांची स्थिती गाझातील पॅलेस्टिनींप्रमाणे होईल", असं धक्कादायक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं.
तीन नागरिकांच्या कथित हत्येवर काय म्हणाले :"नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता असून ते वारंवार चर्चेची मागणी करत आहेत, मात्र सरकार का बोलत नाही", असं अब्दुल्ला म्हणाले. पूंछच्या सीमावर्ती जिल्ह्यात सैन्यानं ताब्यात घेतलेल्या तीन नागरिकांच्या कथित हत्येवर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणं किंवा सैन्याच्या अधिकाऱ्यांची अदला-बदली केल्यानं न्याय मिळणार नाही", असं ते म्हणाले.
पीडितांच्या कुटुंबियांना सरकारी मदत : गेल्या आठवड्यात पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधील टोपा पीर भागात दहशतवाद्यांनी सैन्यावर हल्ला करून तीन जवानांना ठार केलं होतं. यानंतर सैन्यानं १५ हून अधिक स्थानिक रहिवाशांना अटक केली आणि त्यांना कथितरित्या मारहाण केली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेत अज्ञात लोकांविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर जम्मू-काश्मीर प्रशासनानं पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली आहे.
हे वाचलंत का :
- "तेव्हा दुसरा काही पर्यायच नव्हता", अमित शाहंच्या नेहरूंवरील टीकेला फारुख अब्दुल्लांचं उत्तर