नवी दिल्ली :दिल्लीच्या जंतरमंतरवर आज १५ व्या दिवशीही कुस्तीपटूंचे प्रदर्शन सुरूच आहे. त्याचबरोबर अनेक राज्यातील शेतकरी संघटनाही या पैलवानांच्या समर्थनार्थ पोहोचल्या आहेत आणि महापंचायती घेत आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या खाप पंचायतींशी संबंधित अनेक संघटनांचे सदस्य सकाळपासूनच जंतरमंतरवर पोहोचत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत हेही जंतरमंतरवर पोहोचले आहेत. पंजाबमधील शेतकरी संघटनांमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग आहे. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना 11 मे पर्यंत न्याय मिळाला नाही तर 16 मे रोजी संपूर्ण दिल्ली बंद करू, अशी घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे.
'11 मे पर्यंत पैलवानांच्या मागण्या पूर्ण करा' : हरियाणाचे खाप पंचायत सदस्य सुरेंद्र कोच यांनी जंतरमंतरवर मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, सर्व खाप पंचायतींच्या चर्चेनंतर एकतर 11 मे पर्यंत पैलवानांना न्याय मिळावा, अन्यथा सरकारने चक्का जामसाठी सज्ज राहावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मे पर्यंत पैलवानांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हरियाणातील जनता दिल्लीच्या सर्व सीमांवर पोहोचेल, असे ते म्हणाले. राजस्थानचे लोक मथुरा रोडने दिल्लीला जातील आणि पंजाबचे शेतकरी टिकरी, सिंधू सीमेवर पोहोचतील. उत्तर प्रदेशच्या खाप पंचायतीशी संबंधित लोक गाझीपूर सीमा रोखतील.