चंदीगड :शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच एमएसपी आणि इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. यासाठी एकूणपाच शेतकरी संघटना संसदेकडे कूच करणार आहेत. दिल्लीच्या बंगला साहिब येथे शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येत आहेत. संसदेवर मोर्चा नेणाऱ्या या शेतकरी संघटनांमध्ये भारतीय किसान महासंघ, भारतीय किसान युनियन मानसा, भारतीय किसान युनियन राजेवाल, आझाद किसान संघर्ष समिती आणि किसान संघर्ष समिती पंजाब यांचा समावेश आहे.
जंतरमंतरवर शेतकरी आंदोलन करणार : आजपासून संसदेच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यावेळी 2 ते 3 हजार शेतकरी निदर्शने करतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा विरोध रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बंगला साहिब गुरुद्वाराचे पोलीस छावणीत रूपांतर केले आहे. शेतकऱ्यांना जंतरमंतरवर जाण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क आहे. पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत.