अंबाला - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करत आहेत. येत्या 26 ते 27 नोव्हेंबरला पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटना केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत. ‘दिल्ली चलो’चं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. शेतकरी दिल्लीकडे जात असून त्यांच्यासोबत भारतीय शेतकरी संघटनाचे प्रदेश अध्यक्ष गुरनाम चढूनी आहेत. दिल्लीकडे जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी थांबले नाहीत.
फक्त अंबालामध्ये नाही तर इतर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन पाहायला मिळत आहे. यमुनानगरमधील भारतीय शेतकरी संघटना लोकशक्तीचे प्रदेश अध्यक्ष जगबीर सिंह यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आणखी रोष निर्माण झाला. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी शेतकऱ्यांना धैर्य ठेवण्याचे आवाहन केले आहे.