नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे सिंघु बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 19 वा दिवस आहे. मात्र, यातच एक दु:खद घटना घडली आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मक्खन सिंह असे मृत शेतकऱ्यांचे नाव असून ते पंजाबमधील रहिवासी आहेत.
मक्खन सिंह गरीब कुटुंबातील असून ते मजूरी करून आपला उदारनिर्वाह करत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते पंजाबहून दिल्लीला आले होते. त्यांना एक मुलगी असून दोन मुले आहेत. पोलिसांनी मक्खन सिंह यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबाला सोपवला आहे. आतापर्यंत शेतकरी आंदोलनात 12 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.
सिंघु बॉर्डरवर पंजाबमधील शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू आंदोलनाचा आज 19 वा दिवस -
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. या आंदोलनादरम्यान आज शेतकऱ्यांनी एका दिवसाचे उपोषण केले. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. बुधवारी केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. त्यानंतर रविवारी जयपूर-दिल्ली आणि दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस-वे बंद करण्यात आला होता. शेतकरी दिवसेंदिवस आपले आंदोलन तीव्र करत आहेत. तसेच, पंजाब-हरियाणामधील आणखी शेकडो शेतकरी, आणि इतर राज्यांमधील शेतकरीही दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत.
काय आहेत कृषी कायदे?
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यांनुसार शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचा कृषीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तर दुसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याने व्यापाऱ्यासोबत केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच तिसऱ्या कायद्यामुळे डाळी, तेल बियाणे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर झाले आहेत.
हेही वाचा -कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ; 'झेड' सुरक्षा अन् 'बुलेटप्रूफ' गाडी