नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंघू बॉर्डरवर एका शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पानिपतच्या पार्क रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी सोनिपत पोलीस तपास करत असून संबधित शेतकरी हा कर्नालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. यातच आज पुन्हा एका शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. पाला सिंग असे मृत शेतकऱ्यांचे नाव असून ते पंजाबच्या पटियालामधील रहिवासी आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. यापूर्वी गेल्या सोमवारीही एका शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. मक्खन सिंह असे मृत शेतकऱ्यांचे नाव होते. हे दोन्ही शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंजाबहून दिल्लीला आले होते. आतापर्यंत आंदोलनात 5 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.