लखनऊ :Urdu poet Munawwar Rana passed away : प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी मध्यरात्री जगाचा निरोप घेतला. रात्री उशिरा लखनौच्या पीजीआय रुग्णालयात उपचार घेत असताना राणा यांना हृदयविकाराच्या झटका आला. यावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. राणा गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. तसंच, त्यांच्यावर लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते. ते मुत्रपिंड आणि हृदयाशी संबंधित आजारानं ग्रस्त होते.
'मा' ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता : 26 नोव्हेंबर 1952 रोजी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या राणा यांना उर्दू साहित्य आणि कविता, विशेषत: त्यांच्या गझलमधील योगदानामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची काव्यशैली त्यांच्या स्पष्टतेसाठी प्रख्यात होती. कारण राणा यांनी फारसी आणि अरबी टाळत हिंदी आणि अवधी शब्दांचा समावेश केला होता. यावेळी रसिकांमध्ये त्यांची विशेष ओळख निर्माण झाली होती. त्यांनी आपलं बहुतेक आयुष्य पश्चिम बंगालमध्ये व्यतीत केलं. पारंपारिक गझल शैलीतील आईचे गुण समोर आणणारी 'मा' ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता होती.
सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येचं समर्थन : कवी मुनव्वर राणा हे उत्तर प्रदेशच्या राजकीय घडामोडींमध्येही सक्रिय होते. राणा अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळं वादातही सापडले होते. तालिबानची बाजू घेतल्याबद्दल आणि त्यांची महर्षी वाल्मिकीशी तुलना केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती. प्रेषित मोहम्मद यांचं व्यंगचित्र काढल्यानं सॅम्युअल पॅटी यांची 2020 मध्ये हत्या करण्यात आली होती. शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येचं समर्थन केल्याबद्दल राणा यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
राजकारणात खूप सक्रिय : राणा यांना मिळालेल्या इतर पुरस्कारांमध्ये अमीर खुसरो पुरस्कार, मीर तकी मीर पुरस्कार, गालिब पुरस्कार, डॉ. झाकीर हुसेन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांच्या कलाकृतींचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. राणाची देश-विदेशातील मुशायऱ्यांना मोठी उपस्थिती होती. मुनव्वर राणा यांनी 2014 मध्ये त्यांनी उर्दू साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला. देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पुन्हा कधीही सरकारी पुरस्कार न स्वीकारण्याची शपथ त्यांनी घेतली होती. दरम्यान, मुनव्वर राणा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खूप सक्रिय होते. त्यांची मुलगी सुमैया या अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाच्या सदस्य आहेत.