रायपूर -छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका गावात पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाचही व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे. पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाथेना गावात शनिवारी ही घटना घडली. राम ब्रीज गायकवाड (वय 52) जानकीबाई गायकवाड (वय 47), मुलगा संजू (वय 24), मुलगी ज्योती (वय 21) आणि दुर्गा (वय 28), अशी मृतांची नावे आहेत.
आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती -
या प्रकरणाची माहिती मिळाताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सर्वप्रथम राम आणि संजू यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिली. पोलिसांनी आणखी तपास केला. राम यांच्या शेताजवळ आणखी तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले. त्यांची ओळख पटवली असता त्या राम गायकवाड यांच्या पत्नी आणि मुली असल्याचे समोर आले. त्यांच्या मृतदेहांजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. 'आर्थिक कारणांमुळे आम्ही आत्महत्या करत असून त्यासाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये', असे त्यात लिहिले असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.