नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली येथे एका बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी नेत्यांशी विविध संघटनात्मक बाबी आणि मुद्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर, फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची देखील भेट घेतली. याबाबत फडणवीस यांनी ट्विटरवर माहिती दिली.
हेही वाचा -मायदेशी परतले टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडू, दिल्लीतील हॉटेलमध्ये सन्मान सोहळा आयोजित
फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे हानी झालेल्या रसत्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि माजी मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना केले धन्यवाद
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. पुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, जेणेकरून त्यांना त्वरित मदत मिळू शकेल, अशी विनंती करण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री सीतारामन यांची भेट घेतली. त्याचबरोबर, कोणतीही बँक स्थगितीखाली ठेवल्यास खातेधारकांची ५ लाखांपर्यंतची ठेव सुरक्षित करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल फडणवीस यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले.
यासंदर्भात संसदेत विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यामुळे छोट्या ठेवीदारांना मदत होईल, अशी आशा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
फडणवीस यांनी केली 'ही' विनंती
स्वयं-पुनर्विकास योजनेंतर्गत सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना एसईसी/डीसीसीबीद्वारे निधीसाठी निकष शिथिल करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची विनंती देखील फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली. यावेळी बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरही उपस्थित होते.
हेही वाचा -शिल्पा शेट्टी अन् तिच्या आई विरोधात कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल