हैदराबाद - भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत आहे. दररोज लाखांच्या घरात नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे देशभर चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल लॅन्सेट ने एका रिपोर्टमध्ये कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना व भारत सरकारच्या तयारीवर काही प्रश्न उपस्थित केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारत बेहाल -
रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की भारतात कोरोना रुग्णसंख्येचे विक्रमी आकडे दररोज समोर येत आहेत. अमेरिकेनंतर जगात सर्वाधित रुग्णसंख्या भारतात आहे. भारतात एप्रिल रोजी एक लाख नवीन केसेस समोर आली होती. हा आकडा 21 एप्रिल 3 लाखांवर वर गेला. महाराष्ट्र व दिल्लीसारख्या राज्यांच्या उदाहरण देऊन सांगण्यात आले आहे, की काही राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे, मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करणाऱ्या राज्यात नवीन ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची सर्कस सुरू आहे.
अनेक शहरांमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यानंतर राज्यांमध्ये लॉकडाऊन व कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपानंतर ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याबरोबरच अन्य आरोग्य सुविधा वाढवल्या जात आहेत. रिपोर्टमध्ये पीएम मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आधार घेऊन सांगण्यात आले आहे की, पीएम मोदींनी 25 एप्रिल रोजी म्हटले होते, की देशात रुग्णालये, व्हेंटिलेटर व औषधांच्या पुरवठ्यासाठी दिवस-रात्र काम केले जात आहे.
दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करण्यात आले -
रिपोर्टमध्ये पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीनाथ रेड्डी यांनी म्हटले आहे, की 2021 मध्ये धोरणकर्तांबरोबरच प्रसारमाध्यमे व जनतेमध्ये भ्रम निर्माण झाला की, भारताने कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवले आहे. इतकेच नाही तर शास्त्रज्ञांनीही या गोष्टीचा प्रचार केला की, आता कोरोनाची दुसरी लाट येणार नाही. याच यंत्रणेने निर्बंध हटवून आर्थिक विकास साधण्यासाठी बाजार सुरू करणे व बंदी उठवण्यावर जोर दिला.
निवडणूक सभांमध्ये लाखोंची गर्दी -
या वर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या केसेस खूपच कमी होत्या. त्यानंतर मार्च महिन्यात सार्वजनिक समारंभात लोकांची गर्मादी वाढू लागली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर देशाचे पंतप्रधान मोदींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेकडो सभा व रॅली काढल्या.
रिपोर्टमध्ये बंगालमध्ये एका प्रचार सभेत पीएम मोदींच्या एका वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये मोदींनी म्हटले होते, की मी लोकांची इतकी मोठ्या प्रमाणातील गर्दी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. निवडणूक प्रचाराच्या वेळी त्यांच्या पक्षाचे लोक जाहीर सभांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत होते, जेणेकरून अधिकाधिक लोक सभेसाठी येतील.
निवडणूक आयोग व कुंभ मेळा आयोजनावरही ताशेरे -
रिपोर्टमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निवडणूक आयोजनासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात मोठ-मोठ्या सभा व रोड शो झाले, मात्र याकडे आयोगाने डोळेझाक केले. निवडणुकीच्या अंतिम आठवड्यात केवळ रोड शो व रॅली काढण्यावर थोडेसे निर्बंध लावले. नेत्यांना ५०० लोकांच्या उपस्थितीत सभा घेण्याची परवानगी देण्यात आली.