नवी दिल्ली - काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी डेहराडून ( Priyanka Gandhi in Uttarakhand ) दौऱ्यावर आहेत. उत्तराखंड निवडणुकीची तयारी सुरू झाल्यापासून उत्तराखंड काँग्रेस प्रियंका गांधींच्या दौऱ्याची वाट पाहत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रियंका गांधींचा दौरा नियोजित होता. परंतु वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तो दौरा पुढे ढकलावा लागला होता. आज प्रियंका गांधी डेहराडूनमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आज काँग्रेसचे 'उत्तराखंड स्वाभिमान प्रतिज्ञापत्र'ही त्यांच्या हस्ते जारी करण्यात आले. यावेळी ईटीव्ही भारतने प्रियांका गांधी यांच्याशी खास बातचीत ( Priyanka Gandhi's Exclusive Interview with ETV India ) केली.
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर प्रियंका यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत मतदान करण्याचे आवाहन केले. तुमचे मत वाया जाऊ देऊ नका, असे त्या म्हणाल्या. राज्यातील जनतेचा उत्साह पाहून काय वाटते या प्रश्नावर प्रियंका म्हणाल्या, की राज्यातील लोकांमध्ये एवढा उत्साह पाहून मला खूप आनंद होत आहे. राज्यातील जनतेने विकासाच्या जोरावर मतदान करावे, कोणत्या पक्षाने आपल्यासाठी काय केले, याच्या आधारे त्यांनी मतदान करावे.