नवी दिल्ली : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. शनिवारी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, CAPF मध्ये स्थानिक तरुणांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. हिंदीच्या सक्तीला तामिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांनी विरोध केल्यानंतर आता केंद्र सरकारने हिंदी आणि इंग्रजी सोडून इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे.
गृह मंत्रालयाचे निवेदन:CAPF मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांचा समावेश होतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.