श्रीनगर : भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियत या संघटनांवर बंदी घातलेली आहे. मात्र जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियत या संघटनांना पुन्हा सक्रिय करण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियतच्या 10 माजी दहशतवाद्यांच्या सुरक्षा दलांनी मुसक्या आवळल्या आहेत. या माजी दहशतवाद्यांवर यूएपीए ( UAPA ) कायद्याच्या कलम 10, 13 आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या विविध कलमांनुसार कोठीबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानी हस्तकांच्या सूचनांवरुन आखली योजना :जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियत या संघटनांवर देशविरोधी कृत्य केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. मात्र काही माजी दहशतवाद्यांनी या संघटनेला पुन्हा सक्रिय करण्यासाठी कट आखल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पाकिस्तानच्या काही हस्तकांच्या सागण्यावरुन या संघटनेला पुन्हा नवजीवन देण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांच्या जवानांनी ही कारवाई केली आहे.
केजीसी आणि जेकेएलएफची झाली बैठक :पाकिस्तानस्थित हस्तकांच्या सांगण्यावरून या संघटनांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली होती. यातील सदस्य परदेशातील हस्तकांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे. त्यापैकी काही फारुख सिद्दीकीच्या नेतृत्वाखालील काश्मीर ग्लोबल कौन्सिल आणि JKLF चे राजा मुझफ्फर यासारख्या फुटीरतावादाचा प्रचार करणाऱ्या गटांचे सदस्य असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. केजीसी आणि जेकेएलएफ या संघटनांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी बैठक झाली. बैठकीचा खरा अजेंडा पुनरुज्जीवनाच्या रणनीतीवर चर्चा होता. ही बैठक म्हणजे या मरगळलेल्या संघटनांच्या पुनरुज्जीवनासाठी काम सुरू करण्याचा एक उघड प्रयत्न होता. 13 जून 2023 रोजी या गटाची प्राथमिक बैठक झाली होती, यामध्ये बहुतेक जण उपस्थित असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.