कोलकाता World Cup 2023 : भारताचा परंपरागत स्पर्धक असलेल्या पाकिस्तान संघासोबत शनिवारी झालेल्या विश्वचषकातील महासंग्रामात पाकिस्तानच्या संघानं सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे पाकिस्तानी माजी खेळाडूंकडून पाकिस्तानी संघावर टीका करण्यात येत आहे. भारत पाकिस्तान संघातील झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. मात्र अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या या सामन्यात रंगत न आल्यानं क्रीडाप्रेमींची निराशा झाली आहे. याबाबत पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी ईटीव्ही भारतसोबत खास बातचीत केली.
पराभवासाठी पाकिस्तानचे खेळाडू जबाबदार :पाकिस्तानचा माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी पाकिस्तानच्या संघावर टीका केली आहे. पराभवाला पाकिस्तानचे खेळाडू जबाबदार असल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाकिस्ताननं आपला पराभव घडवून आणला असल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी नमूद केलं. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर 155 धावा होत्या, मात्र त्यानंतर खेळाडूंनी बेजबाबदार फटके मारल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी सांगितलं. भक्कम स्थितीत असलेला संघ 191 धावांवर बाद झाल्यानं आपण निराश झाल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी नमूद केलं.
रोहित शर्माची कूटनीती सरस ठरली :भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं जोरदार प्रदर्शन करत हा विजय संपादन केला आहे. पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीचं श्रेय रोहित शर्माला दिलं पाहिजे असंही मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी सांगितलं. रोहित शर्मानं केलेल्या जोरदार खेळामुळेचं पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी स्पष्ट केलं.