हैदराबाद - भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा ( Miss Universe Harnaz Sandhu ) किताब पटकावला आहे. पंजाबच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स ( Miss Universe Harnaz Sandhu ) ही सौंदर्यस्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात 75 हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी भाग घेतला होता, मात्र तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यापैकी एक भारताची हरनाझ संधू होती. दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वे या दोघांनाही मागे टाकून भारताच्या हरनाझ संधूने वैश्विक सौंदर्याचा मुकुट पटकावला. त्यानिमीत्ताने 'ईटीव्ही भारत'च्या रिपोर्टर मानसी जोशी यांनी दूरदृष्यप्रणीद्वारे तिच्याशी संवाद ( Exclusive Interview With Harnaaz Sandhu ) साधला. यावेळी, मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने ( Miss Universe Harnaz Sandhu ) संयम आणि मेहतीने काम करा. यश तुमचेच आहे. अपयशाने खचून जाऊ नका, त्यातून काही शिका, असा सल्ला तरुणांना दिला.
मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यावर तुझी भावना काय होती?
पहिल्यांदा माझे नाहीतर माझ्या देशाचे नाव पुकारले जात होते, हा माझ्यासाठी अभिमानास्पद असा क्षण होता. गेल्या कित्येक दिवसांपासून याची वाट मी पाहत होते. जेव्हा पुढील मिस युनिव्हर्स भारताची आहे, असे म्हटलं गेलं तेव्हा मला खुप गर्व वाटला. मला रडू कोसळले. हा क्षण संपुर्ण देश पाहत होता. देशवासीयांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठींब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी तू कशाप्रकारे तयारी केली?
मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी माझ्याकडे फक्त 30 दिवसांचा कालावधी होता. हे एकप्रकारे माझ्यासाठी आव्हानात्मक होते पण अशक्य नव्हते. दररोज डाएट, मेक-अप, हेअर, जीम, ट्रेनिंग तसेच वेगवेगळ्या शूटींग, बैठका असायच्या. मी केलेलं हे कष्ट माझ्या कामाला आले.
तु चंदीगडच्या रहिवाशी आहात.. चंदीगडने हरनाझला काय दिले..?
माझे सर्व शिक्षण चंदिगडमध्ये झाले. तिथे पंजाब, हरियाणा, शिमला अशा विविध राज्यातील गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. त्यामुळे ते मला खूप आवडते. सध्या मी चंदीगडला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे.
मॉडेलिंगमध्ये येताना कुटुंबाचा पाठिंबा होता का?
मला प्रत्येक गोष्टीत कुटुंबाने साथ दिली आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत मी देशाची शान बनेल असा विश्वास त्यांना होता. माझी आई स्त्रीरोगतज्ज्ञ असून ती चांगली मैत्रीण आहे. तर वडील मला पंजाबची वाघीण म्हणतात. मोठा भाऊ हा माझा पाठीराखा असल्याने प्रत्येक बाब मी त्याच्याशी बोलते आणि सल्ला घेते. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचले आहे.
तु मॉडेलिंगला सुरुवात कुठे केली?
17 व्या वर्षी मी माझ्या मॉडेलिंगला सुरुवात केली. सुरुवातीला चंदीगड, पंजाब आणि नंतर देशाचे प्रतिनिधित्व केले. एक म्हण आहे ना जे होते ते चांगल्यासाठीच होते. नंतर मी मागे कधीच वळून पाहिले नाही. जसजशी प्रगती करत गेले, तसतसे मी माझ्या चुकांवर काम केले.