बंगळुरू - देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच भर डेल्टा (Delta), डेल्टा प्लस (Delta plus) नंतर आता इटा कोरोना व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे. कर्नाटकच्या मंगळुरूत एटा व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.
मंगळुरूतील एका व्यक्तीला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. संक्रमित व्यक्ती चार महिन्यांपूर्वी दुबईहून दक्षिण कन्नडमधील मूदाबिद्रे येथे आली होती. चाचणी केल्यावर, संबधित व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शरिरात आढळलेला कोरोनाचा नमुना आरोग्य विभागाने पुढील अभ्यासासाठी प्रयोग शाळेत पाठवला होता. आतापर्यंत या प्रकारावर बरेच अभ्यास झालेले नाहीत. 2020 मध्ये यूके आणि नायजेरियात या व्हेरिएंटची रुग्ण आढळली. नायजेरियात जास्त रुग्ण नोंदवली गेल्याची माहिती आहे. मात्र, भारतात दुसऱ्यांदा इटा व्हेरिएंटचा रुग्ण आढळ्याची माहिती आहे. यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये राज्यात इटा व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं.
दिलासादायक बाब म्हणजे या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. कारण हा व्हेरिएंट जुना आहे. जर हा धोकादायक असता तर आतापर्यंत याचे बरेच रुग्ण आढळून आले असते. तर अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचं कारण आहेत. कोरोनाचे स्ट्रेन सतत बदलत असल्याने जग अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.