नवी दिल्ली :कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जूनपर्यंत वाढवली आहे. 3 मे रोजी संपणारी अंतिम मुदत 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आल्याचे EPFO ने मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पात्र कर्मचारी आता अधिक निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी 26 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विद्यमान भागधारक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास EPFO ने 4 नोव्हेंबर 2022 ला सांगितले होते.
अनेक कर्मचाऱ्यांनी केली होती विनंती :ईपीएफओने आपल्या विद्यमान आणि माजी सदस्यांना उच्च पेन्शनची निवड करण्याची संधी दिली पाहिजे, असे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद होते. त्यासाठी काही अटी व व्यवस्थाही ठेवण्यात आल्या होत्या. तथापि, कर्मचारी संघटनांच्या अनेक प्रतिनिधींनी ईपीएफओला मुदत वाढवण्याची विनंती केली. हे लक्षात घेऊन उच्च निवृत्ती वेतनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांचा योग्य विचार करून ही मुदत वाढवण्यात आली आहे. यामुळे पेन्शनधारक आणि विद्यमान भागधारकांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याची माहितीही ईपीएफओने दिली आहे.