श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी दोन चकमकींमध्ये सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. काल रात्रीपासून शोपियानमध्ये सुरू असलेल्या चकमकीत पाच, तर आज पहाटेपासून त्रालमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक; त्रालमध्ये दोन, तर शोपियानमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा - अवंतीपोरा चकमक
![जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक; त्रालमध्ये दोन, तर शोपियानमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा Encounter breaks out in JK's Awantipora](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11336021-852-11336021-1617940209812.jpg)
08:45 April 09
जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक; पाच दहशतवाद्यांचा खात्मा
त्राल भागामध्ये दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी याठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यांपैकी एख दहशतवादी अन्सर गझवात उल हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, शोपियानमध्ये आज पहाटेपर्यंत तीन दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. सकाळीपासूनच लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. हे दोघे मशीदीमध्ये लपून गोळीबार करत होते. या दोघांनाही अर्ध्या तासाच्या फरकाने ठार करण्यात आले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे कारवाई करत ही शोधमोहीम राबवली. या कारवाईमध्ये सात एके-४७ रायफल्स आणि दोन पिस्तुल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, २०२१मध्ये आतापर्यंत तब्बल ४० दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.