श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक झाली. श्रीनगरच्या मल्हूरा परीमपोरा भागात झालेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोघांपैकी एक दहशतवादी हा पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. अबरार असं या कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर दुसरा पाकिस्तानी नागरिक होता.
पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अबरार अनेक हत्या प्रकरणात सामील होता आणि त्याला सोमवारी परिमपोरा येथे वाहन तपासणी दरम्यान अटक करण्यात आली होती. अबरारने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने मलूरा येथील एका ठिकाणी एके-रायफल लपविली आहे. पोलीस तिथे पोहोचताच घरात लपलेल्या त्याच्या पाकिस्तानी साथीदाराने गोळीबार केला. या चकमकीत अबरार आणि गोळीबार करणारा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले.
श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा.. प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, दहशतवाद्यांनी महामार्गांवर हल्ला केल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने अनेक ठिकाणी नाकेबंदी केली होती. पारिमपोरा नाक्यावर एक वाहन थांबवण्यात आले आणि आत बसलेल्या लोकांकडून त्यांच्याबद्दल माहिती विचारण्यात आली. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तिने बॅगमधून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर वाहन चालकाला आणि त्या व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या व्यक्तिने मास्क काढल्यानंतर तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबरार असल्याचे स्पष्ट झाले
श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा... अबरारजवळून एक पिस्तूल आणि काही ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी एके-47 लपवल्याची माहिती अबरारने दिली होती, त्या घराला पोलीस आणि जवानांनी घेराव घातला. त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न करताच अबरारच्या आत लपून बसलेल्या साथिदाराने गोळीबार केला. या गोळीबारात अबरार आणि सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात अबरार आणि त्याचा साथीदार मारले गेले. घटनास्थळाहून दोन एके-47 आणि काही ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. अनेक सुरक्षा कर्मचार्यांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये अबरारचा सहभाग होता, असेही त्यांनी सांगितले.