श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत आयईडी स्फोटात पाच जवान शहीद झाले, तर एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान, या भागात दोनहून अधिक दहशतवादी अडकल्याची माहिती आहे. सध्या चकमक सुरू आहे. तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. परिसरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
सुरक्षा दलाचा परिसराला वेढा : मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीमध्ये सकाळी 7.30 वाजता चकमक सुरू झाली. रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांना भाटा धुरियनच्या तोटा गली भागात दहशतवादी लपल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या दिशेने गेलं, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनीही बचावासाठी गोळीबार केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. आतापर्यंत एकाही दहशतवाद्याच्या मृत्यूचे वृत्त मिळालेले नाही.
बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी चकमक :बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली होती. या चमकमीत लष्कर ए तोयबाचे दोन अतिरेकी मारले गेले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये शाकीर माजिद नजर आणि हनान अहमद सेह यांचा समावेश असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या वतीने देण्यात आली होती. ह दोघेही दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे दोघे यावर्षी मार्चमध्ये दहशतवाद्यांच्या गटात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम पायीन क्रेरी भागात अतिरेकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून सुरक्षा दलांनी घेराबंदी करुन शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार :बुधवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. जम्मू काश्मीर बुधवारी सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी दिली. बुधवारी सकाळी दहशतवाद्यांना सैन्याने पाहिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :Buddha Purnima : इतरांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करा, बुद्ध पोर्णिमेनिमित्त दलाई लामांचा अनुयायांना संदेश