पलामू (झारखंड) : झारखंडच्या चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. पलामू - चतरा सीमेवर झालेल्या चकमकीत गौतम पासवान या 25 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवाद्यासह 5 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून तीन आधुनिक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी शोधमोहीम केली सुरू : चकमकीचे ठिकाण चतराच्या लावलाँग आणि पलामूच्या पंकीच्या द्वारकाच्या सीमावर्ती भागात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत आणखी नक्षलवादीही ठार झाले असल्याची शक्यता आहे. चकमकीनंतर पलामू, चतरा आणि लातेहार पोलिसांनी एकाच वेळी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून अनेक ठिकाणे सील केली आहेत. पलामू - चतरा सीमा भागात नक्षलवाद्यांचा एक मोठा गट लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कोब्रा 203, सीआरपीएफ, जग्वार आणि पलामू - चतरा जिल्हा दलाने नक्षलविरोधी अभियान सुरू केले. या मोहिमेदरम्यान सोमवारी सकाळी चतरा येथील लावलॉंग भागात सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली.