तिरुअनंतपुरम (केरळ) - आपण हिंसा आणि द्वेषाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकतो पण हिंसाचार आणि द्वेषाच्या जोरावर देशासाठी काहीही करू शकत नाही, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या देशातील प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे आणि जर कोणी इतर भारतीयांचा द्वेष करत असेल तर तो भारताच्या कल्पनेचा तिरस्कार करतो. विशिष्ट विचारसरणीतून जन्माला आलेले राग आणि द्वेषाचे वातावरण आज आपल्याकडे आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, काही लोकांनी भारते जोडोबद्दल विचारले आहे, तर यामध्ये अनेक महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. आपल्याला लाखो गरीबांचे दुःख कमी करायचे आहे. हे करणे सोपे नसले तरी ते करावे लागेल असही ते म्हणाले आहेत.
लोकांना संबोधित करताना राहुल म्हणाले की, केरळच्या लोकांनी एकत्र उभे राहणे, सामंजस्याने काम करणे हे अतिशय स्वाभाविक आणि सामान्य आहे. तसेच, तुम्ही हे बाकीच्या देशाला दाखवून दिले आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा १९ दिवसांत केरळचे संपूर्ण अंतर कापणार आहे. आजच्या दौऱ्यात राहुल यांनी वाटेत स्वागतासाठी उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला. यादरम्यान ते मुलांसोबत भेटताना, खेळताना आणि लाड करताना दिसले. त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.
या प्रवासादरम्यानचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत त्यांनी लिहिले की, हे अंतर कापताना सर्वांमध्ये आपुलकी आणि प्रेम दिसत आहे.