लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत पक्षाची रणनीती जाहीर केली. यासोबतच मायावतींनी ईव्हीएमबाबतही रडगाणे गायले आहे. येत्या निवडणुकीत बसपा कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असेही मायावती म्हणाल्या.
मायावतींचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह : ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत मायावती म्हणाल्या की, 'गेल्या विधानसभा निवडणुकीत दलितांनी बसपाला मतदान केले होते, पण जेव्हा मशीन्स उघडली गेली तेव्हा मते इतरत्र गेलेली होती. ईव्हीएममुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसपाचा जनाधार कमी होत नसून ईव्हीएममध्येच काहीतरी गडबड आहे, अशी माझी भावना आहे. ईव्हीएमची यंत्रणा सुरू करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे. येत्या काही दिवसांत त्यांची यंत्रणा डळमळीत होऊ शकते. जागतिक स्तरावर सर्वच देशांमध्ये आधी ईव्हीएमने मतदान झाले, मात्र आता तेथेही बॅलेट पेपरनेच निवडणुका घेतल्या जात आहेत. भारतातही निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरने घ्याव्यात. बॅलेट पेपरच्या मदतीने निवडणुकीत आमच्या पक्षाचा मतदानाचा टक्का नेहमीच वाढला. मात्र मशीन्स आल्यापासून गडबड झाली आहे'.
लोकसभा निवडणुकीत कोणासोबतही युती नाही : त्या पुढे म्हणाल्या की, 'बसपा हा लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी वाहिलेला पक्ष आहे. बंधुभावाच्या आधारे युती करून निवडणुका जिंकून एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणे हे पक्षाचे मुख्य ध्येय आहे. या तत्त्वानुसार पक्ष 2023 मध्ये कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणासोबतही युती करणार नाही. त्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत. कारण युतीबाबतचा आमचा आतापर्यंतचा अनुभव अत्यंत वाईट आहे'.
काँग्रेस-भाजप कडून आरक्षणाचा हक्क मारण्याचा प्रयत्न :काँग्रेसने केंद्रात असताना मागासवर्गीय आरक्षणाबाबत मंडल आयोगाची अंमलबजावणी होऊ दिली नाही. यासोबतच त्यांनी एससी एसटीचे आरक्षणही कुचकामी ठरविले. आता भाजपही या प्रकरणात काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून आरक्षणाचा हक्क मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या नागरी निवडणुकांवरही परिणाम झाला आहे. इतकेच नाही तर सपा सरकारने नेहमीच मागासलेल्या लोकांना त्यांचे हक्क न देता फसवणूक केली आहे.