Election result : उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये मतमोजणीची धावपळ चालू आहे. उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक आणि महापालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी केली जात आहे. तर पंजाबमध्येही लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. 10 मे रोजी जालंधर लोकसभा पोटनिवडणूक झाली होती, त्याचे निकाल आज हाती येणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील काही महापालिका निवडणुकीचे निकालही आज लागणार आहेत. राजधानी लखनौच्या महागनरपालिकेच्या जागेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यानिवडणुकीत भाजपापुढे पुन्हा पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. सपा,काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसोबत भाजपाची टक्कर आहे.
महापालिकेच्या रिंगणात उतरलेत इतके उमेदवार : लखनौच्या महानगरपालिकेच्या जागेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लखनौ महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. लखनौला आज नवे महापौर आणि ११० प्रभागांचे नगरसेवक मिळणार आहेत. या जागेसाठी ४ मे रोजी मतदान झाले होते. लखनौ महानगरपालिकेच्या जागेवर महापौरपदासाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत, तर 110 प्रभागांच्या नगरसेवकांसाठी 807 उमेदवारांमध्ये सामना रंगला आहे.
हे आहेत महापौर पदाचे उमेदवार : भाजपाने महापौरपदासाठी सुषमा खरवाल यांना उमेदवारी दिली आहे, तर सपाकडून वंदना मिश्रा रिंगणात आहेत. बसपाने शाहीन बानो यांना, तर आम आदमी पार्टीने अंजू भट्ट यांना महापौर बनवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान भाजपसाठी ही निवडणूक सुरक्षित असल्याचे मानले जात आहे, परंतु मतदान कमी झाल्याने भाजपाची चिंता वाढली आहे. यावेळी येथे केवळ 36.97 टक्के मतदान झाले आहे.
मागील काळात भाजपाची कामगिरी :2017 च्या महापालिका निवडणुकीत एकूण 16 महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये भाजपाने लखनौ, वाराणसी, आग्रा, मथुरा, फिरोजाबाद, मुरादाबाद, सहारनपूर, झाशी, गोरखपूर, प्रयागराज, गाझियाबाद, शाहजहानपूर, बरेली, कानपूर आणि अयोध्याच्या महापौरपदाच्या जागा जिंकल्या. तर अलिगड आणि मेरठमध्ये बसपचे महापौर विजयी झाले होते. आणि यावेळी शहाजहानपूर जिल्ह्याला पहिला महापौर मिळाल्या होत्या.