बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसत आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून सातत्याने अवैध रोकड, माल आणि दारू जप्त करण्यात येत आहे. अशा निवडणूक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध तपास यंत्रणाही अथक प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे निवडणुक आयोगाने बेंगळुरूच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघात सोमवारी १.०२ कोटी रुपयांचे २.०५ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. दरम्यान, अशा घटनांनी राज्यात कोणत्या पद्धतीने निवडणुका होत आहेत हे लक्षात येत आहे अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक देताना दिसत आहेत.
मोफत भेटवस्तू जप्त करण्यात आल्या : या प्रकरणाबाबत, निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली, की बीटीएम लेआउट मतदारसंघात 1.50 कोटी रुपयांचे 2.67 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि बंगळुरू शहर दक्षिण मतदारसंघात 61.40 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून एकूण 111.11 कोटी रुपये रोख आणि 22.33 कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत असेही निवडणुक आयोगाने सांगितले.