मुंबई :भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना तसेच पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम ठेवले आहे. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केल्यापासून शिवसेनेचे दोन्ही गट पक्ष तसेच धनुष्यबाण चिन्हासाठी लढत आहेत.
प्रतिज्ञापत्र सादर - राज्यात मागील सहा ते सात महिन्यांपासून सत्तासंघर्षावर मोठा संघर्ष सुरू आहे. सध्या या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याआधी शिंदे गट आणि ठाकरे गटांनी लेखी युक्तिवाद निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला त्यांच्याजवळ असलेले पदाधिकारी, नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती.
पक्षचिन्हाच्या सुनावणीत आतापर्यंत काय झाले? : या आधी 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले होते. सर्वोच्च न्यायालयात याबाबत केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा, अशी विनंती केली होती. पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ, असे आयोगाने म्हटले होते. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी युक्तिवाद पूर्ण केला होता. ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. सादिक अली केसनुसार अशा वादावर निर्णयासाठी निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे हे शिंदे गटाने सांगितले होते.
लोकशाहीविरोधी :शिवसेना पक्ष सध्या लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. कोणतीही निवडणूक न घेताच एका गटातील लोकांना पदाधिकारी म्हणून अलोकतांत्रिक पद्धतीने नियुक्त करण्याचा प्रकार घडला आहे. असे ताशेरे निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरेंवर ओढले आहेत.
लोकशाहीची तत्त्वे पाळण्याचा सल्ला : राजकीय पक्ष आणि त्यांच्या वर्तनावर ऐतिहासिक निर्णयात, आयोगाने सर्व राजकीय पक्षांना लोकशाही, नैतिकता आणि पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीची तत्त्वे पाळण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाशी संबंधित वेबसाइटवर त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या कामकाजाचे संघटनात्मक तपशील, निवडणुका घेणे, पदाधिकाऱ्यांची यादी टाकावी असे आयोगाने म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले. उद्धव ठाकरे यांनी लोकशाही विरोधात निर्णय दिल्याचे सांगत निवडणूक आयोगावर जोरदार आगपाखड केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला दिला. तसेच 2019 नंतर शरद पवार यांच्या दावणीला बांधलेला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह सोडवला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना डिवचले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मेरिटचा विचार करून दिलेला निर्णय : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. निवडणूक आयोगाने मेरिटचा विचार करून दिलेला हा निर्णय आहे. आयोगाने दिलेला निर्णय सत्तेचा विजय आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो आहोत. ५० आमदार, तेरा खासदार शेकडो नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतरही त्यांची तुलना चोर असे केली जाते. आम्ही चोर असू तर हे साव आहेत का? असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच, शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवला जाईल असे सातत सांगितले गेलं.
दावणीला बांधलेले चिन्ह सोडवले : परंतु, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेला पक्ष आणि चिन्ह सोडवला, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार विकण्याचे मोठे पाप केलं होतं. निवडणूक आयोगाच्या आजच्या निकालाने त्यांना मोठी चपराक दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावरती ते टीका करतात. मात्र यांच्या बाजूने जेव्हा निकाल लागतो, तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते आणि विरोधात निकाल लागतो तेव्हा ती दबावाखाली काम करते, ती विकली गेली आहे, अशा टीका केली जाते. त्यांनी हा दुटप्पीपणा सोडून द्यावा आणि स्वतः आत्मपरीक्षण करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, राज्यात बेकायदेशीर सरकार असल्याचा आरोप केला जातोय. मात्र, आमचे सरकार नियमानुसार कायद्यानुसार आहे, असे ठामपणे सांगितले. ठाकरे परिवारावर यावेळी टीका देखील केली.
हेही वाचा -Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाना पटोलेंसह उद्धव ठाकरेंची फिरकी