नवी दिल्ली Rahul Gandhi : निवडणूक आयोगानं गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. राहुल यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेल्या 'पाकिटमार' आणि 'पनौती' या टिप्पणीबद्दल आयोगानं ही नोटीस बजावली आहे. आयोगानं त्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं. राहुल गांधींविरोधात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं निवडणूक आयोगात धाव घेतली होती.
निवडणूक आयोगाच्या कानपिचक्या : एका ज्येष्ठ नेत्यानं अशी भाषा वापरणं दुर्दैवी असल्याचं भाजपानं आयोगाला सांगितलं. निवडणूक आयोगानं राहुल गांधींना आठवण करून दिली की, आदर्श आचारसंहिता नेत्यांना राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर असत्यापित आरोप करण्यास मनाई करते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील नुकत्याच झालेल्या सभांमध्ये पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत 'पनौती', 'पाकीटमार' अशा शब्दांचा वापर केला होता.
काय म्हणाले होते राहुल गांधी : राहुल गांधींनी राजस्थानमध्ये निवडणुकीच्या भाषणात मोदींना उद्देशून 'पनौती' हा शब्द वापरला होता. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलग १० विजयानंतर अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे राहुल यांनी मोदींना उद्देशून या शब्दाचा वापर केला. हिंदी भाषेत 'पनौती' शब्दाचा अर्थ वाईट नशीब आणणारी व्यक्ती, असा होतो. राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या भाषणात नरेंद्र मोदींवर 'पाकीटमार' या शब्दाचा वापर करूनही टीका केली होती. राहुल यांनी आरोप केला होता की, "पंतप्रधान मोदी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवतात, तर उद्योगपती गौतम अदानी त्यांचे खिसे कापतात. पाकीटमार अशा प्रकारे काम करतात".
कॉंग्रेसचं प्रत्युत्तर : निवडणूक आयोगाच्या या नोटीसला आम्ही योग्य प्रतिसाद देऊ, असं कॉंग्रेसनं म्हटलंय. "पंतप्रधान मोदींच्या संदर्भात राहुल गांधींच्या 'पनौती' आणि 'पाकीटमार' सारख्या शब्दांमध्ये काहीही चुकीचं नाही. राहुल गांधींनी हे शब्द वापरताना थेट कोणाचंही नाव घेतलं नाही", असं काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं.
हेही वाचा :
- "आपण अंतिम सामना हारलो कारण तेथे 'पापी लोक' उपस्थित होते", ममता बॅनर्जींचं वादग्रस्त वक्तव्य
- "आपण विश्वचषक जवळपास जिंकलाच होता, मात्र 'पनौती'मुळे...", राहुल गांधींची मोदींवर नाव न घेता टीका