नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यामुळे राहुल नावाच्या एका व्यक्तीला तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. या व्यक्तीने केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीत त्याने 2196 मते घेतली होती. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी 7 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.
कायदा काय सांगतो? : 29 मार्च रोजी, मतदान पॅनेलने लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 10 ए अंतर्गत अपात्र ठरलेल्या व्यक्तींची अद्ययावत यादी जारी केली होती. हे राहुल नावाचे व्यक्ती 13 सप्टेंबर 2021 पासून ते 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अपात्र ठरले आहेत. कलम 10 ए नुसार, जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की एखादा व्यक्ती निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत आणि कायद्याने आवश्यक असलेल्या पद्धतीने भरण्यात अयशस्वी ठरला आहे तर आयोग अशी कोणत्याही व्यक्तीला आदेशाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरवू शकतो.