हैदराबाद - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले असे स्पष्ट होत आहे. सध्या तरी त्यांच्यामागे केवळ शिवसेनेचे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेतून ते कायदेशीर रित्या बाहेर पडून वेगळा गट स्थापन करु शकतात. या सर्व आमदारांची आमदारकी त्यामुळे धोक्यात येणार नाही. पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर यामुळे दूर झाल्याचे दिसत आहे.
सूरतमध्ये शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार होते. त्यानंतर त्यातील 2 आमदार आपली सुटका करुन परतल्याने त्यांच्याकडील आमदारांची संख्या 30 झाली. मात्र त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे, उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले. हे सगळेच शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे मानण्यात येत आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच गुवाहाटीला दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे आमदार जर शिंदे यांना जाऊन मिळाले तर त्यांचे 2/3 बळ होईल. त्यांना हीच मॅजिक फिगर गाठायची होती. ती गाठली गेली असेही म्हणता येईल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भले मोठे खिंडार पाडून बाजी मारल्याचेच स्पष्ट होत आहे.
सूरतचा घटनाक्रम - शिंदे यांना ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. सुरतमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यानंतर एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेण्यात आले. या सर्व आमदारांना ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये ठेवले आहे. सेनेचे ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला असताना गुलाबराव पाटील, रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित या गुवाहाटीत पोहचल्या. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.