जयपूर : राजसमंदचा उगवता क्रिकेटपटू भरतसिंग खरवड याला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी अचानक भेटीसाठी बोलावले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 16 वर्षीय भरतने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याचे वडील, मामा यांच्यासह भेट घेतली. त्याने मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्याला क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केले. या खेळाडूचा क्रिकेट खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाहिला होता. त्यांनी त्यानंतर ट्विट करीत ( Impact of Rahul Gandhi Tweets ) अशोक गेहलोत यांना टॅग केले. त्यानंतर वेगाने हालचाली होऊन या क्रिकेटपटूचे आयुष्य सुकर होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुख्यमंत्र्यांनी नवोदित गोलंदाज आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सध्याच्या प्रशिक्षणाची माहिती घेतली. सवाई मानसिंग स्टेडियमवर चालणाऱ्या क्रिकेट अकादमीमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यास कौशल्य वाढेल, असे सांगितले. प्रशिक्षणासोबतच निवास आणि भोजनासह सर्व सुविधाही पुरविल्या जातील. राजस्थान क्रिकेट अकादमीचे (आरसीए) अध्यक्ष वैभव गेहलोत, गोलंदाजाचे वडील कालू सिंग, मामा गणेश कडेचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यावेळी उपस्थित होते.