नवी दिल्ली -पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य नागरिक त्रासले असताना आता खाद्य तेलाच्या वाढत्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किमती या देशातील खाद्य तेलाच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाने सांगितले आहे.
तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ -
दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. अशीच भाववाढ महाराष्ट्रातही दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी खाद्य तेलांच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने त्यात लक्ष घातल्याने दर कमी झाले. पण हा दिलासा काही दिवसांसाठीच राहिला. आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडतील असे चित्र उभे राहिले आहे.