नवी दिल्ली ED Summon To Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीनं केजरीवाल यांना 18 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी केजरीवाल यांना ईडीनं तीनवेळा समन्स पाठवले होते. मात्र, पण तिन्ही वेळी केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
चौथ्या समन्सनंतर ईडीसमोर हजर होणार :मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल 18, 19 आणि 20 जानेवारीला गोव्याला जाणार आहेत. त्यामुळं ईडीनं पाठवलेल्या चौथ्या समन्सवरही केजरीवाल चौकशीसाठी ईडीच्या मुख्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. केजरीवालांचा गोवा दौरा लोकसभा निवडणुकीच्या तयारीशी संबंधित असून यावेळी ते गोव्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यापूर्वी 11 आणि 12 जानेवारीला केजरीवाल यांचा गोवा दौरा प्रस्तावित होता, मात्र प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसंबंधित बैठकीमुळं हा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता.
ईडीनं बजावलेलं समन्स राजकारणाशी संबंधित :3 जानेवारीला ईडीनं अरविंद केजरीवालांना समन्स बजावलं होतं. त्यावेळी आम आदमी पार्टीने, अरविंद केजरीवाल ईडीला चौकशीत सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. मात्र, ईडीनं बजावलेलं समन्स हे राजकारणाशी संबंधित आहे. अरविंद केजरीवालांना अटक करण्याचा ईडीचा डाव आहे, असा आरोप केला होता. मात्र, ईडीकडून बजावण्यात आलेल्या चौथ्या समन्सनंतर अद्याप आम आदमी पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
ईडीचे चौथ्यांदा समन्स : अरविंद केजरीवाल यांना यापूर्वी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 3 जानेवारीला असे एकूण तीन समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, या तिन्ही समन्सला अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाही. त्यामुळं आता चौथ्या समन्सनंतर केजरीवाल ईडीसमोर हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- दिल्ली दारू घोटाळा : भाजपाला मला अटक करायचं आहे, अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप
- दिल्ली दारू घोटाळा : अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडी छापेमारीची आप नेत्यांनी वर्तवली शक्यता
- चौकशी टाळून गेले विपश्यनेला, ईडीच्या नोटीशीला केजरीवालांचं वकिलांमार्फत उत्तर, कायदेशीर चौकशीसाठी तयार