चेन्नई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडी आणि त्यांचे खासदार पुत्र गौतम सिगामनी यांच्या चेन्नईमधील घरावर छापा टाकला. या दोघांवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असून त्याअंतर्गत छापा मारण्यात आला आहे. तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडी गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडार होते. डीएमके पक्षातील पोनमुडी हे दुसरे नेते आहेत. याआधी ईडीने सेंथिल बालाजी यांच्यावर मालमत्तेवर छापेमारी करत त्यांना अटक केली होती.
हे आहेत आरोप : या महिन्याच्या सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पोनमुडी यांच्यासह इतर 6 जणांची जमीन बळकावल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती. 1996 आणि 2001 च्या काळात पोनमुडी यांच्यावर चेन्नईतील सैदापेट येथील सरकारी जमीन बेकायदेशीरपणे घेतल्याचा आरोप होता. या काळात ते द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) चे मंत्री होते. तसेच 2007 आणि 2011 मध्ये द्रमुकच्या राजवटीत पोनमुडी खाणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत खाणीच्या अटींचे उल्लंघन केले होते. खाणींच्या अटींचे उल्लंघन करत पोनमुडी यांनी बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा केला होता, असा आरोपही त्यांच्यावर होता. याप्रकरणी विल्लुपुरम जिल्हा गुन्हे शाखा पोलिसांनी मंत्री पोनमुडी आणि जयचंद्रनसह 3 जणांना अटक केली होती. विल्लुपुरममधील खासदार आणि आमदारांविरुद्धच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.