नवी दिल्ली Land For Job Scam : 'लँड फॉर जॉब' प्रकरणात ईडीने राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मिसा भारती, हिमा यादव, हृदयानंद चौधरी आणि अमित कत्याल यांच्या नावांचा समावेश आहे.
4 ऑक्टोबर 2023 ला न्यायालयानं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना जामीन मंजूर केला होता. सीबीआयनं 3 जुलै रोजी दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत न्यायालयानं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि इतर सर्व 17 आरोपींना 23 सप्टेंबरला समन्स बजावलं होतं.
भोला यादव आणि हृदयानंद चौधरीला अटक : 'लँड फॉर जॉब' घोटाळा प्रकरणात सीबीआयनं भोला यादव आणि हृदयानंद चौधरी यांना अटक केली होती. भोला यादव 2004 ते 2009 पर्यंत लालू यादव यांचे ओएसडी होते. यादरम्यान जमीन घोटाळा झाला होता. तेव्हा रेल्वेमधील गट डी नोकरीच्या बदल्यात लालू कुटुंबाला भेटवस्तू किंवा अगदी कमी किंमतीत जमीन मिळाली. नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तसंच भोला यादव या घोटाळ्याचा सूत्रधार मानला जातो. दरम्यान, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सीबीआयनं या प्रकरणी लालू यादव यांच्या कुटुंबाशी संबंधित 17 ठिकाणी छापे टाकले होते. सीबीआयने लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील ठिकाणांवर छापे टाकले होते.
हेही वाचा -
- Land For Job Scam : तेजस्वी यांना मिळाले समन्स, लालू यांच्या कुटुंबीयांनंतर आता तेजस्वी यादव यांची चौकशी
- Lalu Yadav Bail : जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव व कुटुंबियांना जामीन मंजूर
- CBI Raid On Rabari Devi House : राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयचा छापा, जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा आरोप