पणजी(गोवा) - पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणात गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राकेश कुमार वाधवन आणि सारंग कुमार वाधवन यांच्या उत्तर गोव्यात 31.50 कोटी रुपयांच्या दोन स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.
ईडीचे याचिका सत्र - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार प्रवीण राऊत यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपांच्या अनुषंगाने ईडीने याचिकेचा पाठपुरावा सुरू ठेवला होता .मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. तरीही ईडीने या जामिनाला विरोध करण्यासाठी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यांच्यावर आहेत आरोप : पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये राकेश कुमार वाधवान, राकेश वाधवान यांचा मुलगा सारंगकुमार वाधवान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी केवळ प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोघांना अटक करण्यात आली होती.
प्रकरणाचा घटनाक्रम : खासदार संजय राऊत यांच्या गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीने छापा टाकला होता. यानंतर संजय राऊत यांची 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊत यांची 7 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी रात्री उशिरा राऊत यांना अटक केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राऊत यांना ईडीने न्यायालयात हजर केले होते. पीएमएलए न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. अखेर न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता.
पत्राचाळ प्रकरण नेमके काय- पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.
हेही वाचा -Patra Chawl case: पत्राचाळ प्रकल्पात तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचा ईडीचा दावा