रांची ( झारखंड ) -आयएएस पूजा सिंघल, तिचा पती अभिषेक आणि सीए सुमन कुमार यांचीही ईडीने गुरुवारी चौकशी केली. गुरुवारीच ईडीच्या पाच सदस्यीय पथकाने सरोगी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवरही छापे टाकले. गुरुवारी सायंकाळपर्यंत चाललेल्या छाप्यांमध्ये ईडीच्या पथकाने बिल्डर आलोक सरावगी यांची चौकशी केली. त्याचे वडील गणेश सरावगी यांचाही जबाब नोंदवायचा होता. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे गणेश सरावगी यांची चौकशी होऊ शकली नाही.
आयएएस पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांनी पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी जमीन खरेदी आणि बांधकामात कोट्यवधी रुपये खर्च केले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डर आलोक सरावगी यांच्यावर टाकलेल्या धाडीमध्ये ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील आणि गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीच्या अधिकार्यांनी न्यायालयाला सांगितले की, आलोक सरावगी, सुमन कुमार, पूजा सिंघल आणि अभिषेक झा यांच्या धाडीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांनुसार आणि माहितीनुसार त्यांची चौकशी करायची आहे.
समोरासमोर चौकशी - गुरुवारी (दि. 12 मे) दुपारी 1.30 नंतर, ईडीने समोरासमोर बसून तिन्ही आरोपींची चौकशी केली. यापूर्वीच्या तपासात अभिषेक झा यांनी सरावगी बिल्डर्सकडूनच पल्स हॉस्पिटलसाठी बरियाटू येथे जमीन खरेदी केल्याचे समोर आले होते. यापूर्वी ही जमीन रुंगटा कुटुंबाच्या ताब्यात असली तरी संपूर्ण जमीन आदिवासी भुईंहरी जमातीची आहे.