नवी दिल्ली Mizoram Assembly Election Result २०२३ : मिझोरामच्या निवडणुकांची तारीख बदलली असून, मिझोरामचा निकाल हा सोमवारी अर्थात 4 डिसेंबर रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगानं याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळं आता रविवारी म्हणजेच 3 डिसेंबरला चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल (EC Reschedules Vote Counting) जाहीर होणार आहेत.
तारीख बदलण्याचं कारण सांगितलं : मिझोरामच्या लोकांसाठी रविवारचे विशेष महत्त्व आहे. या कारणामुळं तारीख बदलण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे. निकालाची तारीख बदलण्यासाठी अनेकांनी निवेदन दिले होते. त्यामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
मिझोराम नागरिकांसाठी रविवारचा दिवस आहे खास :मिझोराममध्ये ख्रिश्चन समुदाय बहुसंख्य आहे. या समुदायासाठी रविवाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळं ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे ढकलावी अशी सातत्यानं मागणी विविध स्तरांतून केली जात होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या निवेदनांचा विचार करून मिझोराम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत बदल करून ४ डिसेंबरला मतमोजणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल : येत्या रविवारी अर्थात 3 डिसेंबरला पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार होते. मात्र, मिझोरामचा निकाल आता 4 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळं आता रविवारी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यासंदर्भातली सर्व तयारी झाली असल्याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.
हेही वाचा -पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार? जाणून घ्या, एक्झिट पोल