नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( LAC ) उरलेल्या उरलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन रविवारी उच्चस्तरीय लष्करी चर्चेची 16 वी बैठक ( India China Military Talks ) होणार आहे. ही बैठक LAC च्या भारतीय बाजूच्या चोशुल मोल्डो बैठकीच्या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यात चर्चा झाली होती. चर्चेच्या नवीन टप्प्यात, जिथे अजूनही गतिरोध कायम आहे अशा सर्व ठिकाणांहून सैन्य लवकर माघारी घेण्याचा भारत आग्रह धरू शकतो. याशिवाय देपसांग बुलगे आणि डेमचोक येथील प्रश्न सोडविण्यासाठी ते आग्रही राहू शकतात.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांनी 7 जुलै रोजी बाली येथे पूर्व लडाखमधील परिस्थितीवर चर्चा केली. जी 20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या बाजूला तासभर चाललेल्या बैठकीत जयशंकर यांनी पूर्व लडाखमधील सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज वांग यांना सांगितली होती. परराष्ट्र मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काही भागांतून सैन्य मागे घेण्याचा संदर्भ देताना, उर्वरित सर्व भागातून पूर्णपणे माघार घेण्यासाठी ही गती कायम राखणे आवश्यक आहे यावर भर दिला. सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी याची गरज आहे.
चर्चेचे गुऱ्हाळ -सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यापूर्वीची बैठक 11 मार्च 2022 (शुक्रवारी) रोजी झाली होती. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा करण्यात आली होती. भारतीय हद्दीतील चुशुल मोल्डो मीटिंग पॉइंटमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची ही 15 वी फेरी पार पडली होती. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्याआदीही दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या 14 फेऱ्या झाल्या होत्या, परंतु तोडगा अद्याप निघालेला नाही.