जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे आज पहाटे 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.6 इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचे केंद्र कटरा पासून 97 किमी अंतरावर आहे. भूकंपामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 33.10 अक्षांश आणि 75.97 रेखांश होता. भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चार दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये भूकंप : 13 फेब्रुवारील पहाटे सिक्कीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.3 मोजण्यात आली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला 70 किमी अंतरावर असलेल्या युकसोम येथे पहाटे 4.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 27.81 आणि रेखांश 87.71 येथे होता.
देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी : भारतीय मानक ब्युरोने संपूर्ण देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. या झोनपैकी पाचवा झोन सर्वात धोकादायक झोन आहे. या झोनमध्ये भूकंपामुळे विध्वंस होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. देशाचा एकूण 11 टक्के भाग पाचव्या झोनमध्ये येतो. या झोनमध्ये जम्मू-काश्मीर आणि काश्मीर खोरे येतात. तसेच या झोनमध्ये हिमाचल, उत्तराखंड, गुजरात, बिहार आणि ईशान्येकडील सर्व राज्ये समाविष्ट आहेत.