गंगटोक (सिक्कीम): सिक्कीम मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला 70 किमी अंतरावर असलेल्या युकसोम येथे पहाटे 4.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 27.81 आणि रेखांश 87.71 होता. भूकंपाची खोली 10 किमी इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपात सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
तुर्की भूकंपातील मृतांची संख्या :गेल्या आठवड्यात तुर्की आणि उत्तर-पश्चिम सीरियामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 34,000 वर पोहोचली आहे. बचावाचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. रविवारी मृतांचा आकडा किमान 34,179 वर पोहोचला. सीरियातील मृतांची संख्या 4,574 असल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम सीरियाच्या विरोधी-नियंत्रित भागांमध्ये मृतांची संख्या 3,160 पेक्षा जास्त आहे. सरकारी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागांमध्ये एकूण 1,414 मृत्यू झाले आहेत.
भारतात मोठ्या भूकंपाची शक्यता : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी दावा केला आहे की, भारतातही तुर्कीप्रमाणेच मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून लखनऊपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. येत्या काही दिवसांत भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी याबाबत संशोधन केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे.