मुंबई : आज सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडताना दिसले. हे पाहून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण घडल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असलेले एसपीजी तात्काळ अलर्ट मोडमध्ये आली आहे. याप्रकरणाबाबत सकाळी 5.30 वाजता एसपीजीने पोलिसांना माहिती दिली आहे. तसेच या घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा देखील येथे पोहोचला आहे. याप्रकरणी पोलीस तपासात गुंतले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी बरीच चौकशी केली आहे. मात्र अद्यापही याबाबत काही माहिती मिळाली नाही आहे. पंतप्रधानाच्या निवासस्थानाचा परिसर हा नो फ्लाईंग झोनमध्ये येतो. हे ड्रोन नो फ्लाइंग झोनमध्ये उडत होते. आतापर्यंत ड्रोन पकडल्या गेले नाही आहे. हे ड्रोन कोणाचे आहे आणि ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी कसे पोहोचले याचा तपास पोलीस करत आहेत.
पंतप्रधान निवासात प्रवेश कसा आहे? : पंतप्रधान निवासस्थानाकडे प्रवेश 9 , लोककल्याण मार्गावरून मिळते. प्रथम कार पार्किंगमध्ये ठेवली जाते. मग त्या व्यक्तीला रिसेप्शनवर पाठवले जाते. त्यानंतर सुरक्षा तपासणी केली जाते. नंतर त्या व्यक्तीला 7, 5, 3 आणि 1 लोककल्याण मार्गावर प्रवेश दिल्या जाते. पंतप्रधानाच्या निवासस्थानाची सुरक्षा अतिशय कडक आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांना भेटण्यासाठी सुरक्षा प्रक्रियेतून जातात. कोणाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी जायचे असल्यास प्रवेश घेण्यापूर्वी सचिवांकडून यादी तयार केली जाते. ज्या लोकांची नावे यादीत असतील. फक्त त्याच लोकांना आत जाण्याची परवानगी दिली जाते. यासोबत जी व्यक्ती पंतप्रधानांची भेट घेणार आहे, त्यांच्यासोबत ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.