नवी दिल्ली Israel Vessel Attack : अरबी समुद्रात इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जहाज उद्ध्वस्त झालंय. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जहाजावरील क्रू मेंबर्समध्ये 20 भारतीयांचा समावेश आहे. दोन सागरी एजन्सींच्या मते, या जहाजांचा इस्रायलशी थेट संबंध आहे. हा हल्ला भारतापासून वेरावळच्या नैऋत्येस 200 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या Unmanned Aerial System (UAS) द्वारे करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. ब्रिटीश सैन्याच्या विशेष युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) तसंच सागरी सुरक्षा फर्म आंब्रे यांनी सांगितलं की, जहाजावर विविध रसायने होती. तसंच हे जहाज इस्रायलशी संबंधीत आहे.
भारतीय जहाज घटनास्थळी रवाना :भारतीय संरक्षण अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातील बंदरातून मंगळुरूला जात होतं. भारतीय तटरक्षक दलाचं जहाज ICGS विक्रम घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच आसपासच्या परिसरात भारतीय नौदलाच्या युद्धनौकाही 'एमव्ही केम प्लुटो' या व्यापारी जहाजाकडं जात आहेत. भारतीय तटरक्षक डॉर्नियर सागरी पाळत ठेवणाऱ्या विमानाने एमव्ही केम प्लूटो या संकटग्रस्त जहाजाशी संवाद स्थापित केला आहे. ड्रोन हल्ल्यानंतर, जहाजाने आपली स्वयंचलित ओळख प्रणाली बंद केली. जहाजाचा मागोवा घेण्यासाठी ती वापरली जाऊ शकते. जहाजाची ऊर्जा निर्मिती यंत्रणा आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसंच जहाज पुढे जाण्यापूर्वी अधिक तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.